Wednesday, February 9, 2011

एक एकटा.. एकटाच! (The Lonely)

खिशातून रुमाल काढला खरा, पण तो संपूर्ण ओला चिंब झाला होता. घरात येऊन बूट काढले आणि मागे वळून बघितलं तर घामाने भिजलेल्या शर्टाने भिंतीवर ऐक विचित्र नकाशा तय्यार झाला होता. सॉक्स कडे नजर टाकली आणि थेट तसाच बाथरूम मध्ये गेलो आणि सॉक्स काढून धुवायला टाकले. माझे पाय आज खूप गरम झाले होते, जणू काही आगेवर्ती चालून आलो होतो, आणि मला तो गरमपणा जाणवत देखील होता. काम करणे rather कष्ट करणे याला घाम गळणे पण का म्हणतात हे मला आज अगदी मनापासून पटून गेला होता. दमणूक तर झालीच होती, पण नुसती शारीरिक दमणूक नसून, मानसिक दमणूक ही झाली होती. आज मला हळू हळू लक्षात यायला लागलं, की नोकरी करून घर सांभाळणं इतकं अवघड का असतं. पण आज काहीसं वेगळं वाटतंय मला, म्हणजे एका अर्थाने वेगळं ही आहे पण हे सगळं पूर्वी कधी तरी घडून गेल्या सारखं देखील वाटतंय. आज पाउला पाऊलावर देजा-वू (deja vu) झाल्या सारखा भास होतोय. घरी आलो तेंव्हा दार नेहमी प्रमाणे बंदच होतं. मग ते दप्तरातून घराची किल्ली काढण्यापासून ते दार उघडून बूट काढण्यापर्यंत सगळं काही मी अनुभवलेलं होतं. आणि आज मला ते बूट आणि चप्पला सगळे पसरून गेलेले ही दिसले. आज खूप एक-एकटं ही वाटत होतं. घरात कोणी गप्पा मारायला ही नव्हतं.

एकीकडे पोटात कावळे काव-काव करत होते पण ते समोर पडलेले बूट बघवेना. म्हणून आधी ते सगळे बूट आणि चप्पला आवरून नीट कपाटात ठेवले. हे देखील करताना तसच वाटलं, कानात काहीसं पुसट-पुसटसा ओळखीचा आवाज आऐकू येत होता आणि तीच ओळखीची वाक्य मला आऐकू येत होती. मी ते सगळे विचार बाजूला सारून थेट kitchen मध्ये गेलो आणि काय खावा याचा विचार करत बसलो. अचानक कुठूनतरी कांदे पोह्यांचा खमंग वास मला येऊ लागला आणि कोणास ठाऊक का कांदे पोहे करून खावासे वाटले. पण तेवढ्यात कोणी तरी म्हणालं- “जा आधी हाथ पाय धुवून घे..” मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. आज खरच मला कसले तरी भास होतायेत. मी आप-आपलाच हासून हाथ पाय धुवून kitchen मध्ये पुन्हा आलो आणि कांदा चिरायला घेतला. आज कांदा कापताना डोळ्यात पाणीही येत नव्हते. मला थोडसं ते विचित्रच वाटलं. पण आज बहुदा सगळंच काहीसं वेगळंच घडतय या विचाराने, मी हा ही विचार मनातून काढून टाकला. एकीकडे फोडणी देत होतो आणि दुसरीकडे भांड्यात पाणी उकळायला ठेवलं, म्हटलं पोह्यांबरोबर चहा ही असला तर बेत चांगला जमेल. खरं तर इतका दमून आल्यावर एवढं सगळं करत बसण्यात मला अजीबात रस नव्हता, पण भूक इतकी लागली होती आणि त्यातून घरातही कोणी नाही.

तेवढ्यात मला परत एकदा कोणी तरी बोलतंय असा भास झाला आणि एक ओळखीचं वाक्य मला आऐकू आलं- “कुच पाने के लिये कुच खोना पडता है."

ह्या वाक्याने मी अगदी थक्क झालो. मी परत त्याच विचारात ओढला जात होतो आणि मला ते नको होतं. मला माहिती होतं की तसं जर झालं तर मला एकटा असलेल्याची जाणीव खाऊन टाकेल. मी त्या विचारातून बाहेर यायचा प्रयत्न केला पण काही केल्या मला ते काही जमेना. तेवढ्यात हाताला चटका बसला आणि भानावर आलो. kitchen मध्ये सगळी कडे धूर झाला होता. Fire alarm वाजू नये म्हणून पळत Drawing Room मध्ये आलो आणि त्यातली battery काढून तो शेजारच्या टेबलावर ठेवला. पुन्हा kitchen मध्ये जाऊन चटकन gas बंद केला आणि पोह्यांकडे आशेने पाहिलं. पोहे तसे व्यवस्थित दिसत होते फक्त थोडेसे खालून भांड्याला लागून गेले होते. एक चमचा घेऊन चव घ्यावी म्हणालो तर लक्षात आले की नेहमी प्रमाणे मीठ टाकायचे विसरून गेलो होतो. आधी तर नुसताच विसरायचो. आज त्या विचारांच्या कारणा पाई विसरून गेलो होतो. पोह्यान कडे नुसताच पाहत बसलो. खाण्याची इच्छाच मरून गेली होती. "भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी.. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे.." फक्त फरक इतकाच ते करपलेले होते. खरच आयुष्यातली काही क्षणं अशी असतात ज्यांनी मनावर कायमची फोडणी लागते. well ते चांगले किंवा वाईट काही असू शकतात. मनावर एक ओझं असल्यासारखं वाटत होतं. आज मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या आधाराची कमी जाणवू लागली होती.

कोणाशीतरी बोलावसं वाटलं. आता मात्र खूप एकटेपणा जाणवत होता. नकळतपणे डोळ्यात पाणी ही आलं. ते वाक्य मला आजच का आऐकू आले? ह्याचा विचार करत बसलो. जरा वेळाने मला लक्षात आलं की ते सगळं जे मला देजा-वू (deja vu) वाटत होतं ते खरच आधी माझ्या बाबतीत घडून गेलेलं होतं. शाळेतून एक ४थी इयत्तेत्ला मुलगा असाच घरी यायचा तेंव्हा ही खूप दमलेला असायचा आणि घरी कोणी नसायचं. मग तो त्या पाठीवरच्या बोजड दप्तरातून किल्ली काढून ते दार उघडायचा आणि एकदा काय घरात आलो की जणू काही ती शांतता आणि एकटेपण त्याला खाऐला अंगावर येयचा. आल्या आल्या TV किंवा radio लावून सोफ्यावर बसून सॉक्स काढून फेकून देणे आणि बूट कुठेही टाकून देणे. सगळं काही माझ्या डोळ्या समोर उभं राहिलं. आज जशी भूक लागली आहे, तशीच भूक तेंव्हा ही लागलेली असायची, पण ते स्वतःच्या हाताने सगळं करणं तेंव्हा ही तितकच नको-नकोसं वाटायचं. फरक इतकाच की तेंव्हा सगळं तयार पण थंडगार असायचं आणि ते गार जेवायला नको वाटायचं. संध्याकाळी आई घरी आली की तो सगळा पसारा पाहून दररोज तेच म्हणायची- “आरे! आता तरी सगळं आवरून ठेवायला शिक.. पुढे शिक्षणाकरिता बाहेर गावी जावा लागलं की सगळं स्वतःचं स्वतः करावं लागेल.. तुला मोठं व्हायचं आहे ना? मग.. लक्षात ठेव कुच पाने के लिये कुच खोना पडता है..” त्या वाक्याने माझा मनावर एक छाप सोडला होता. काळ बदलला, घर बदलला, पण त्या सॉक्स आणि बुटान पासून, दमून आल्यावर लागलेली ती भूक अजून तशीच आहे आणि कदाचित ते वाक्यही त्याच मुळे मला आऐकू येत असावे. त्यावेळी आई पाशी रडायचो. सगळे मित्र घरी जातात तेंव्हा त्यांची आई त्यांना गरमा-गरम खाऐला घालते. तर आई मला समजवून सांगायची की ते सगळे ती कोणासाठी करत आहे. आणि त्या लहानश्या बुद्धिला ते पटून ही जायचा.

आज पुन्हा एकदा मला आईची खूप आठवण आली. आता मात्र मला राहवेना. त्या सगळ्या घडलेल्या गोष्टी एखाद्या चलचित्रा सारखं दिसू लागलं. तेवढ्यात कोणीतरी दार उघडलं आणि kitchen मध्ये येऊन माझ्याशी काहीतरी बोलून आंत bedroom मध्ये निघून सुद्धा गेला. माझा roomie च अशणार अर्थात. पण तो मला काय म्हणाला मला काही लक्षात नाही. मी माझे ओले डोळे लपवण्याकरिता त्याच्या कडे पाठ करूनच उभा होतो. आता मात्र मला अश्रु आवरेना. बाहेर आलो तर bedroom चं दार बंद होतं. तीन्हीसांझा झलेली होती आणि घरात काळोख होता. आधी दिवा लावला आणि तसाच आंत माझ्या bedroom मध्ये निघून गेलो. कोणाला काही कळू नये म्हणून आतून दार लावून घेतलं आणि ढसा ढसा रडलो. पाकिटातून आईचा फोटो काढला आणि नुसताच एकटक पाहत बसलो. रडणं थांबवण्याचा खूप प्रयत्नं केला पण अश्रु काही थांबेना.

तेवढ्यात फोन वाजला. बाबांचा फोन होता. कसंबसं रडणं थांबवलं आणि मग बाबांशी बोललो. बाबांशी अगदी व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना आजच्या प्रकरणाबद्दल मला अजीबात कळू द्यायचं नव्हतं. बाबा फोन ठेवताना म्हणाले- "आज काय तारीख आहे माहित आहे ना?" मी काही बोलण्याच्या आधीच म्हणाले- “आज 11 February आईचा वाढदिवस असतो लक्षात आहे ना?” मला काही बोलवेना. डोळ्यात परत पाणी येऊ लागलं. आज मला तिची इतकी आठवण का येत होती, आजच ते वाक्य मला का आऐकू येत होते, आजच का ते लहानपणीचे शाळेतून दमून आलेल्याचे दिवस, लहानपणे तिला दिलेला त्रास का आठवत होते, ते लक्षात आलं. मी परत आईच्या फोटो कडे पाहिलं, तेवढ्यात बाबा म्हणाले- “एका महिन्याने आईचा वर्ष-श्राद्ध आहे, तुला India ला येयला जमेल का??”. ‘माहित नाही.. मी विचारतो..’ त्यांनी फोन ठेवला होता. आईच्या फोटो कडे बघत मी अजूनही तसाच रडत होतो. फोटो छातीपाशी घेतला आणि जरा वेळ पडलो. “नात्यांच्या ह्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी, आणि म्हणे 'तो वरचा' जुळावी शतजन्मांच्या गाठी”.

जरा वेळाने डोळे कोरडे पडले. उठलो आणि स्वतःला आवरून kitchen मध्ये गेलो. ते पोहे आणि तो चहा गार ढोण होऊन गेला होता. आणि खरा तर ती भूक सुद्धा आता मरून गेली होती.


Rohan Ambre
(with valuable inputs from Sudhanwa Agawekar)